११००० फुटांवरून मी आपली पृथ्वी बघत होते! सगळे अतिशय शांत, सुंदर, जणू नंदनवन! दूरवरचे पर्यटन स्थळ, नद्या, डोंगर, दऱ्या सगळ्या स्पष्ट दिसत होत्या! कानात वाऱ्याचा आवाज घोंगावत होता!डोळ्यांच्या कडांना पाणी साठून ते आनंदाश्रू वर वर जात होते! आणि गुरुत्वाकर्षण काय जादुई गोष्ट आहे, हे मी प्रत्यक्ष अनुभवत होते!
दहावीचे वर्ष सुरूच होणार होते, तेव्हा उन्हाळ्यात शाळेतर्फे एक शिबीर आयोजित करण्यात आले होते, फक्त काही निवडक मुलांसाठी. सुट्टीत मध्येच काय भलते म्हणून जराशा नाराजीनेच गेले होते. तिथे बाकी पुष्कळ काही रटाळवाणे सुरु होते मात्र सत्राच्या शेवटी एक नवीनच सर आले आणि त्यांनी अभ्यास कसा करावा, वेळेचे नियोजन असे काहीही न सांगता सगळ्यांना डोळे मिटायला सांगितले! डोळे मिटून आपण जसे दिसत असू त्याची कल्पना करायला सांगितली आणि मग जर आपण आपल्या ह्या बसलेल्या देहाला दहा फूट उंचीवरून बघितले तर कसे दिसेल, वीस फुटांवरून कसे दिसू असे मनात कल्पना करायला सांगितली. ते हळूहळू आपल्या प्रत्यक्ष देहात आणि आपण कल्पना करत आहोत त्यातील अंतर वाढवत राहिले, म्हणजे शंभर फुटांवरून कसे दिसेल आपलेच डोळे मिटून बसलेले शरीर, शहराच्या सर्वांत उंच इमारतीवरून कसे दिसेल शरीर, मग देशातील सर्वांत उंच ठिकाणाहून, मग चंद्रावरून कसे दिसेल, आणि मग अंतरिक्षातुन शरीर कसे दिसेल आपलेच आपल्याला. मुद्दा हा होता की मन स्वतःच्या वस्तू स्थितीपासून किती दूर नेता येते ह्या करता हा खटाटोप. मग हळूहळू करत मन अगदी टप्याटप्याने पुन्हा खाली आणायचे होते. आता हा सगळा प्रकार नेमका काय आहे ते आम्हाला काही केल्या समजत नव्हतं, मात्र मला ती संपूर्ण प्रक्रिया खूपच आवडली! म्हणजे असे उंच उडता येऊ शकेल? कल्पनेत अशी उंच भरारी घेता येईल आणि ह्याचबरोबर जाणवले की ह्या संपूर्ण प्रक्रियेमुळे मनातली उंचीची भीती जाऊन ओढ लागली उंचावर जाण्याची! त्या दिवशी त्या सरांना आम्हाला उतुंग विचार करायला शिकवायचा होता, म्हणून त्यांनी ही संपूर्ण प्रक्रिया आमच्याकडून करून घेतली होती!
पुढे मी इतकी गुंगून जाऊन ही प्रक्रिया करू लागले की तो माझ्याच असण्याचा भाग झाला! मला तशी स्वप्न देखील पडू लागली! म्हणजे असे की मी खूप उंच उडते आहे! अगदी उंच, आणि मग हळूहळू खाली येते आहे तरंगत!
आता हे स्वप्न मला अनेकदा पडत असे, मात्र त्याला काही फारसे कारण वगैरे नसे, आणि मी देखील ती गोष्ट गांभीर्याने घेणे सोडून दिले! मात्र मनाला एक ध्यास कायमचा लागला होता, उंचावर जाण्याचा आणि तरंगत खाली येण्याचा!
करत करत वर्षे सरली आणि माझी चाळीशी येऊन ठेपली, मला त्या निमित्ताने नवऱ्याने अनोखी भेट दिली! स्काय डायव्हिंगचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक!
मला अक्षरशः प्रत्यक्ष स्काय डाइव्ह करायचे आहे हेच मुळी बारा चौदा तास आधी समजले! म्हणजे जे स्वप्न इतके वर्ष बघितले, पुढे जवळ जवळ विसरूनही गेले, त्यातील इच्छा पूर्ण होणार होती! मधली सगळी वर्षे नुसत्या कल्पनेनेही मिटून गेली! तोच शाळकरी मुलीचा उत्साह संचारला आणि सुरवात झाली एका अनोख्या अनुभवाची! अनेक लोकांनी जगभरातील विविध ठिकाणी स्काय डाइव्ह केल्याचे व्हिडीओ, सामाजिक माध्यमांतून समोर आले होते, तरी तो आता माझा स्वतःचा अनुभव असणार होता! आम्ही जॉर्गीया राज्यांत सिल्वानिया ह्या खेडेगाव सदृश ठिकाणी गेलो, इथे अनेक शेतजमिनी होत्या, त्यातील एकाच्या जवळ गेल्यावर अचानक आकाशातून काही रंगीत खाली येणारे ठिबके दिसत होते! ती माणसे होती! पॅराशूटनी खाली येणारी! हवेत तसा माफक गारवा होता मात्र आकाश निरभ्र होते! आम्ही गाडी पार्क करून आत शिरलो तर तिथे एक मोठा हॉल होता, अनेक तरुण तरुणी तिथे रंगीत पॅराशूटची घडी घालत होते, काही मंडळी तिथे सुरु असलेल्या कर्कश गाण्याचा ताल धरून थिरकत होती आणि एक मध्यमवयीन स्त्री तिथे काऊंटरपाशी होती. तिथे जाऊन रीतसर तिकिटे दाखवली तेव्हा अनेक पानी फॉर्म भरण्यास तिने सांगितले, हे फॉर्म म्हणजे वेव्हर होते, जेणेकरुन काहीही दुखावपत, अपघात अथवा मृत्यू झालाच स्काय डायव्हिंग करतेवेळी तर तेथील शिक्षक, संचालक अथवा मालक ह्यांची जबाबदारी नसून, संपूर्ण जबाबदारी माझी स्वतःची असेल, अशा अर्थाची जवळ जवळ शंभर पाने आणि त्यावर किमान साठ वेळा सह्या करून घेतल्या! त्यातील एक एक ओळ वाचताना मला हसावे का रडावे असे झाले! म्हणजे माझी नातवंडे देखील ह्या मंडळींच्या नातवंडांना कायदेशीर दृष्ट्या काहीही करू शकणार नाहीत इतपत लिहिले होते! माझा नवरा ते वाचता वाचताच म्हणत राहिला, तू बघते आहेस ना तू काय करू इच्छितेस ते!

मी निवांत होते, हसत हसत सह्या केल्या आणि माझी वेळ येण्याची वाट बघत आम्ही सगळे थांबलो होतो! थोड्या वेळाने एक छोटे विमान शेजारच्या हॉल सदृश हँगर मधून बाहेर आले! जोनाथन लिविंगस्टन सिगल कॉलेजमध्ये वाचताना ज्या छोट्या विमानांची नावे, वर्णने होती, सगळी डोळ्यासमोरून तरळून गेली! तर त्या छोट्या विमानात एकावेळी सहाच उडी मारणारी लोकं बसू शकत होती, आणि त्यांचे सहा प्रशिक्षक! एकूण बारा लोक. साधारण १५००० फूट उंचीपर्यंत विमान वर जात असे आणि पाच हजार फुटांपासून त्यातील माणसे खाली उडी मारत होती! सगळ्यांत उंच म्हणजे १५००० फुटांवरून जे व्यावसायिक आहेत, ह्या खेळातले, त्यांना उडी मारण्याची परवानगी असते, आणि अजिबात कोणताही अनुभव नसताना नवशिके असतात त्यांना ११००० फुटांवरून उडी मारण्याची परवानगी असते. त्या खालोखाल १०५००, ६५०० आणि ५००० फुटांवरून देखील उडी मारता येते.
थोड्यावेळानी ते विमान वरती गेले आणि काही पॅराशूट त्यातून खाली आली! बघतानाच इतके रोमहर्षक होते की मी माझ्या प्रशिक्षकाची आतुरतेने वाट बघत होते!
थोड्यावेळानी एक धिप्पाड तरी माझ्या पेक्षा उंचीने काहीसा कमी असा एक गोरा माणूस माझ्यापाशी आला, अतिशय उत्साहाने मला विचारले की मला उडी मारायची आहे का, कशाला इत्यादी! माझा वाढदिवस असून त्याची भेट म्हणून उडी मारणार आहे असे समजून त्यालाच अधिक उत्साह चढला! त्याने मला सगळे सविस्तर सांगितले, कसे हातवारे करायचे, तोंड कसे करायचे, श्वास कसा घ्यायचा आणि उतरतेवेळी पायांची स्थिती कशी ठेवायची इत्यादी. साधारण दहा मिनिटाने त्याने मला बेल्ट उप करायला सुरु केले, दोन्ही पायांमधून कंबरेपर्यंत जाणारे तीन चार बेल्ट त्यांनी आवळून घातले. एक बिन बाह्यांचे जॅकेट दिले आणि डोळ्यांवर घालायला एक मोठा चष्मा दिला. तसेच त्या जॅकेटवर मागील बाजूस डेंजर, अर्थात धोका असे भडक केशरी रंगावर लिहिले होते.
वरून अजून काही पट्टे माझ्या पाठीवरून मागे जाणारे होते, त्याला आणि कंबरेच्या पट्ट्यांना मिळून अनेक जाडसर धातूची बक्कल होती. सगळा जामानिमा करून मी माझ्या नवऱ्यापाशी आणि दोन लहानग्या मुलींपाशी आले! त्यांच्या तिघांच्या ओठी उत्साह होता तरी डोळ्यात थोडी अनाम भीती होतीच! माझा स्वभाव ओळखून असलेला नवरा जाणून होता की ह्या क्षणासाठी मी किती आतुर होते!
मी इतर उडी मारणाऱ्या मंडळींसोबत विमानाकडे चालू लागले! माझे प्रशिक्षक माझ्याशी गप्पा मारत विमानात चढले! विमान तसे गमतीशीर होते! म्हणजे नेहेमी असतात तशा आडव्या रांगा, खुर्च्या असे काहीच त्यात नव्हते, तर चक्क बागेत असतात तसे दोन लाकडी बाक होते आणि बस मध्ये असतात तशा आडव्या सळ्या होत्या हात धरायला!
एक व्यक्ती आमच्या आधी होता, त्या मागोमाग माझे प्रशिक्षक बसले बाकावर दोन्हीकडे पाय टाकून आणि त्यांच्या पुढ्यात अगदी खेटून मी बसले. इतर मंडळी देखील विमानात तशीच बसली. एका हाताने खिकडीवरची सळी धरून आम्ही बसलो, कोणताही सीट बेल्ट नाही की काही नाही, इतकेच कशाला, विमानाचे दार देखील सताड उघडे होते! आमच्या विमानाने आकाशात झेप घेतली, पुढील सात एक मिनिटात पाच सहा हजार फूट उंची गाठली आणि आमच्या पहिल्या जोडीने त्या उघड्या दारापाशी जाऊन उडी घेतली, पाच हजार, सहा हजार आणि साडे सहा हजार फुटांवरून उड्या घेणारी मंडळी पटापट झेपावली! ही सगळी मंडळी विशीतली होती! नुकतेच सज्ञान होऊन केलेल्या धाडसी कृत्यातले एक असा काहीसा विचार करून ही सगळी तरुणाई आलेली होती! त्या नंतर विमानाचे दार बंद केले, अजून एक पाच सात मिनिटात विमान साडे दहा हजार फुटांवर गेले! खालची शेते अगदीच छोटी, हिरव्या दुपट्यांसारखी दिसू लागली! नद्या नाले सगळेच जणू इवलाले! करत करत माझी पाळी आली, मी अतिशय उत्साहात होतेच! प्रशिक्षक आणि मी हळूहळू सरकत दारापाशी आलो, पाठीला असलेले आणि कंबरेचे सगळे बक्कल प्रशिक्षकाच्या छातीला आणि मांड्यांना असलेल्या इतर बक्कलांशी जोडलेले होते. माझ्या पाठीवर जणू माझे प्रशिक्षक बांधलेले होते! बॅकपॅक सारखे! बॅकपॅकचे स्ट्रॅप जसे आपण धरू तसे धरून एक खोल श्वास घेऊन, एक दोन आणि तीन म्हणाले की उडी, असे आमचे जमिनीवर ठरलेले मात्र प्रत्यक्ष वेळ आली की लोक अनेकदा खाली बघून घाबरतात आणि तीन म्हणतेवेळी दारावरच्या सळीला अचानक धरतात, ह्यातून गंभीर धुखापत होऊ शकते, म्हणून प्रशिक्षक एक आणि दोन म्हणायच्या मध्येच कधीतरी आपल्याला जोरात खाली उडी मारायला लावतात! मला होते, कधी एकदा मी उडी मारते असे मला झाले होते! मला असलेले उंचीचे आकर्षण मी अक्षरशः जगत होते! ११००० फुटांवरून मी आपली पृथ्वी बघत होते! सगळे अतिशय शांत, सुंदर, जणू नंदनवन! दूरवरचे पर्यटन स्थळ, नद्या, डोंगर, दऱ्या सगळ्या स्पष्ट दिसत होत्या! कानात वाऱ्याचा आवाज घोंगावत होता!डोळ्यांच्या कडांना पाणी साठून ते आनंदाश्रू वर वर जात होते! आणि गुरुत्वाकर्षण काय जादुई गोष्ट आहे, हे मी प्रत्यक्ष अनुभवत होते! न्यूटन, त्याचे सफरचंद तर माहित असते, मात्र त्यात त्या सफरचंदाच्या जागी मी होते! पृथ्वीकडे झेपावले होते! माझे प्रशिक्षक आणि मी हा सगळा नजारा बघत होतो! तेव्हा नुकतेच इस्राएल, पॅलेस्टाईन युद्ध सुरु झाले होते जगात, त्या वेळी मी जेव्हा इतक्या उंचावरून पृथ्वी बघत होते, मला विश्वास बसत नव्हता की इतक्या सुंदर अशा ठिकाणी लोकांना युद्ध का बरी सुचत असतील! इथे असलेली अमाप किमया, इथले सौंदर्य हे डोळ्यात अक्षरशः मावत नव्हते, चहुबाजूने हिरवाई नटली होती, मध्येच एखाद झाडाची पाने रंगीत होऊ लागलेली होती! पाण्यावर सूर्याची बिंब पडून पाणी जणू मौल्यवान हिऱ्यासारखे लकाकत होते आणि वाऱ्याला भारतीय परंपरेत देव का संबोधले असावे! श्री हनुमानाला वायुपुत्र का म्हणत असावेत, असे सगळेच उमजल्यागत झाले! तीन, साडे तीन मिनिटे काही फार मोठा काळ नसतो मात्र जेव्हा तुम्ही अकरा हजार फुटांवरून उडी मारून जमिनीकडे वेगाने येत असता तेव्हा तो काळ जणू काकवीसारखा दाट आणि हळूहळू सरकू लागतो, त्यातील प्रत्येक सेकंद जणू मनाच्या स्मृतीपटलावर कोरला जातो! तीन साडे तीन मिनिटांनी अचानक आम्ही पुन्हा वर वर जायला लागलो! एक हलका हासडा बसला आणि पॅराशूट उघडले! पॅराशूटची ती छत्री उघडताच आम्ही दोघेही पुन्हा थोडे वर गेलो आणि मग हळू हळू माझ्या प्रशिक्षकाने पॅराशूटवर नियंत्रण मिळवले! मगाशी घोंगावणारा वारा अचानक शांत झाला आणि आम्ही दोघेच शांत तरंगत सात हजार फुटांवर अक्षरशः गप्पा मारू लागलो! मला इतके काय काय बोलायचे होते! हे सौंदर्य कोणाशी तरी वाटून घ्यायचे होते!
विमानातून दिसणारे जग निराळे आणि त्या जगाकडे वेगाने झेपावताना, त्याचे बदलणारे आकारमान, पृथ्वीवरच्या सगळ्या समस्या अगदी छोट्या भासू लागल्या, दूर कुठे वाहतूक कोंडी झालेली होती, ती गाड्यांची रांग त्यात अडकल्यावर इतकी मोठी वाटते मात्र इथून वरून ती छोटीशी वाटत होती, धरणे लेगो ची बांधल्यागत वाटत होती! नद्यांच्या रेघोट्या कोणी सहज मारल्या असाव्यात असे वाटत होते, आणि वरून एकही गोष्ट दुरावलेली, हद्दीत गुरफटलेली वाटत नव्हती, ना कोणत्या राज्याच्या देशाच्या सीमा दिसत होत्या, ना कोणतेही भेद जाणवत होते! माणसे मुंग्यांहून लहान दिसत होती तर बाकी सगळे तसेच भातुकलीच्या खेळासारखे वाटत होते! मनात इतका आनंद, इतके विचार दाटून आले होते! का भांडतो आपण? युद्ध कशाला हवीत? समस्यांवर किती वेळ आपण मन अडकवतो, खरेच त्याची गरज आहे का? ही पृथ्वी खरोखर किती सुंदर आहे, नंदनवन जणू, स्वर्ग ह्याहून काही निराळा असणारे? खरोखर किती शुल्लक आहेत आपल्या जगातल्या समस्या आणि आपण स्वतः देखील! पक्ष्यांची समृद्धी काय वर्णावी! रोज मन करेल तिथून स्वतःच्या पंखातील बळ एकवटून सहज आकाशात झेपावता येते! आणि खाली बघितले तर हे अफाट सौंदर्य रोज हवे तितक्यांदा अनुभवता येते! एक क्षण मन इतके दाटले की नवे विचार येईचनात मनात! अचानक मन कोरे झाले! पॅराशूट जवळ जवळ पाच सात मिनिटे तरंगत खाली येणार होते, मात्र त्यातील प्रत्येक क्षण मी अधिक जिवंत होऊन जगत होते! विचार थांबले, मन कोरे, अचानक मनात एकाच अभंगाची लकेर दरवळू लागली! “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती!”
संत तुकाराम मनात उमटले! खरोखर त्यांना तसे वाटले असेल का? आभाळाचा असाच तुकडा त्यांना आकाशगमन करतेवेळी दिसला असेल का? का त्यांच्या मनातच त्यांना असे काही भव्य अद्भुत आणि विलक्षण सौंदर्य दिसले असेल?
सगळेच अद्भुत, दैवी! म्हंटले तर अंतर दोन सव्वा दोन मैलाचे मात्र जमिनीपासून वर उभे जाणारे! पार करायला लागणारा वेळ केवळ आठ मिनिटे! मात्र त्यातील प्रत्येक क्षण मनःपटलावर कोरला गेलेला!
एक चिरकाल शांतता मनावर दाट सायीसारखी पसरली! अहंकार गळून गेला, सगळे मनातले लोभ क्लेश मिटले आणि फक्त खोलवर उरली कृतज्ञता! सभोवतालाविषयी, ह्या पृथ्वी विषयी, गुरुत्वाकारक्षणाविषयी, ह्या अवघ्या असण्या विषयी! आपण किती छोटे आहोत, किती खुजे आहोत हेच समजले, आपण स्वप्नांत जे बघितले ते प्रत्यक्ष बघायची ओढ म्हणजे काय ते उमगले आणि अक्षरशः जन्म एका अर्थी सार्थकी लागला!
हळूहळू आम्ही जिथून उडी मारली होती ते ठिकाण दिसू लागले, पुन्हा आम्हाला सोडून खाली उतरणारे ते विमान दिसू लागले आणि खाड्कन भानावर आले, कारण आमच्या विमानाची उतरण्याची दिशा आणि आमची दिशा ही परस्पर विरोधी होती, फार जवळ गेलो तर हवेत सव्वा दोन हजार फुटावर आमची टक्कर संभवत होती! प्रशिक्षकाने चतुराईने पॅराशूटची दिशा बदलली आणि हळूहळू आम्ही जमिनीच्या दिशेने येऊ लागलो, नवरा, मुली आता दिसू लागले, वेगाने जमिनीवरची हिरवळ दिसू लागली, प्रत्येक पाते जणू स्पष्ट निराळे दिसू लागले आणि क्षणार्धात आम्ही जमिनीवर झेपावलो! मी पाय इंग्रजी एल अक्षरासारखे केले आणि माझ्या प्रशिक्षकाच्या अंगावर मी अलगद बसले.
पॅराशूटचा मोठा निंबोणी, जांभळा झगा जमिनीवर मागे फगारून पडला होता! झटपट बक्कल सोडवत माझा प्रशिक्षक उभा राहिला आणि मला हात देऊन उभे करत आम्ही दोघे चालत निघालो, पुन्हा त्या मोठ्या हॉल कडे! वरून काड्यापेटीपेक्षा छोटा वाटणारा हॉल तेवढाच मोठा होता खऱ्या आयुष्यात! पुन्हा जग जमिनीवरून नेहेमीसारखे दिसू लागले, मात्र आता मला एक निराळी दृष्टी लाभल्याने मला ते अधिक लोभसवाणे आणि सुंदर भासत होते!
संपली होती प्रक्रिया! मी मुलींना घट्ट जवळ घेतले! नवऱ्याच्या डोळ्यातल्या ओसंडून वाहण्याऱ्या कौतुकाने सुखावले! आणि थोड्यावेळ चक्क गवतात डोळे मिटून पडून राहिले! अजून माणसे त्या इवलाल्या विमानातून वर जात होती, पॅराशूटचा रंगीत सडा अधून मधून जमीनीवर अलगद पडत होता आणि त्या निरभ्र आभाळातून लताबाईंच्या दैवी स्वरात मला मनात अजून तुकोबाचा अभंग ऐकू येत होता! “जेथे जातो तेथे तू माझा संगती!”
- प्राजक्ता पाडगांवकर