शहरात राहणाऱ्या अनंत माणसांना अजिबात माहीत नसलेली दोन अनमोल रत्न – मौन आणि शांतता!
मौनात जे सौन्दर्य आहे, जे उपजत असे सृजन आहे त्यापासून शहरी माणूस हा सदैव वंचित राहिलेला आहे. मौन हे केवळ काहीतरी आलंकारिक, काही करून बघावे असे किंवा एखाद नव्या छंदाचे साधन नसून मौन हे पुष्कळ आदिम आणि मूलभूत असे आहे.
शांतता, म्हणजे आवाजाचा अभाव नसून, सर्व आवाजाचा एक उच्चतम बिंदु आहे. हयात एक आंतरिक लय आहे, एक सृष्टीशी तादात्म्य आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यात निसर्गाचे माग आहेत.
शांतता ही मानविय अनुभवांचे सर्वोच्च असे स्थान आहे. जे जे म्हणून एकू येते त्या ऐकण्यात संदर्भ मिळत जातात. त्याअर्थी कोणत्याही प्रकारचा आवाज हा काही सांगू पाहत असतो, काही संदर्भ देऊ पाहत असतो. मात्र शांतता ही कोणतेच आवाज पोचू देत नसल्याने ऐकणाऱ्याला स्वतःपुरते संदर्भ तयार करता येतात किंवा मग त्यात रममाण होता येतं. शांतता ही एखाद्या डोहासारखी भासते, त्यात पुष्कळ खोल असे काही असते त्याच बरोबर त्यात काही गूढ आणि स्वतः च्या आतले काही ढवळून काढण्याचे सामर्थ्य आहे. शहरात राहून शांतता कधीच अनुभवता येत नाही. औद्योगिकीकरण, त्यानंतरची सर्व स्थित्यंतरे, ह्यांचे अनेक बळी आहेत, त्यातला सर्वात शांत आणि महत्वाचा बळी म्हणजे शांतता! पृथ्वीवरून शांतता पूर्ण नष्ट होऊन अनेक काळ लोटला आहे, आणि आपण सगळेच एका महाकाय कोलाहलात ढकलले गेलो आहोत. ही म्हणावी तर अतिशय किरकोळ घटना किंवा अतिशय गंभीर बाब!
गंभीर ह्याकरता कारण संपूर्ण शांतता म्हणजे नेमकं काय हेच आता समस्त मानव जात विसरून गेली आहे. जन्माला येणारे प्रत्येक बालक हे कोलाहलात जन्माला येत आहे, वृद्ध होणारा प्रत्येक जीव हा कोलाहलात आयुष्य व्यतीत करत आहे. नुसते पाण्याच्या पेल्यासमोर चित्रविचित्र आवाज केले तर पेल्यातले पाणी कंपित होते, त्या ध्वनी लहरी पाण्याचे अवघे असणे हेलावून सोडतात तर आपण सत्तर टक्के पाण्याने/द्रव्याने बनलेले जीव, सततच्या कोलाहलात न बदलता कसे तग धरू? नाहीच धरत आहोत तग. गमावू लागलो आहोत आपण आपलीच खोली, भीती वाटू लागली आहे स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची आणि भिरभिरल्या चित्ताने नवनव्या पळवाटा शोधू पाहत आहोत आपणच, आपल्या बाहेर. अधिक अधिक बहिर्मुख होत चाललो आहोत आणि प्रत्येक प्रश्नाचे मूळ न शोधता, वरवरचे उथळ जे जे कर्कश आहे ते ते निवडत सुटलो आहोत आपण. हे गंभीर ह्याकरता, कारण संतुलन बिघडत चालले आहे आपलेच, आपल्यामुळे, आपल्या कृतींमुळे आणि प्रगतीच्या, विकासाच्या ध्यासामुळे. सततचा चढा आवाज, सततच्या घोषणा, आरोळ्या आणि आर्जव, गोंधळात टाकत आहेत आपल्याच विवेकाला, सततच्या तारसप्तकातल्या आळवण्या विवश करत आहेत आपल्याला. बाहेरच्या जगाचे अनेक हाकारे सतत पेचात ढकलत आहेत प्रत्येकाला. आपली गोष्ट आपल्यालाच ऐकू येईनाशी झाली आहे. ज्या आवाजाचा लळा लावून घेत आहोत तोच आवाज जसे सांगेल तसे निघालो आहोत आपण. त्याचे तादात्म्य, त्याचे हेतू आणि त्याचे आपल्याशी असलेले संबंध सगळेच न तपासता निघालो आहोत आपण. पाईड पायपर च्या उडत्या लेकेरीवरले स्वर ऐकत थिरकणारे क्षुद्र उंदीर बरे म्हणावे इतके दुर्दैवी झालो आहोत आपण.
शांतता मारून काय मिळवले आहे आपण? सगळेच तर गमावले आहे!
अगदी एकट्याने उपनगराच्या टोकावर राहणारा शांत म्हातारा तरी कुठे शांतता अनुभवत आहे? इथे देखील कर्कश आवाज आहेतच, कुठे पोलिसांच्या गाड्या, कुठे कर्णे, भोंगे, विमाने आणि वाहने! कुठे पंख्याची घरघर तर कुठे फ्रिजचा उसासा, कुठे कोणी लावलेली गाणी तर कुठे रेडिओ, टीव्ही आणि इतर काही! कुठे भांड्याचा आवाज, कुठे इतर कोणत्या यंत्राचा आवाज. सतत कानात भरून राहिलेले हे प्रदूषण! मनात झिरपत नसेल? ह्यावर उपाय कुठे आहे? कानात कापूस कोंबा, हेडफोन खुपसा किंवा इतर काहीही करा, शांतता प्रदूषित करणारा आवाज सर्वत्र पोचतो आहेच. घरात, दारात, कानात आणि मनात!
हे सैरभैर करते आहे आपल्या सगळ्यांना, विचारांची शृंखला तयार होऊ देतच नाही, मध्येच फोन वाजतो, मध्येच दारावरची घंटी वाजते, मध्येच काही जोरात आदळते किंवा मध्येच कोणी हॉर्न वाजवतो! सतत सतत अर्धवट विचारांची खुंट कुठे बाळगा म्हणून मग सखोल, सुयोग्य आणि अतिशय निकडीचा विचार करणेच मागे पडू लागते. इतक्या कोलाहलात जन्माला आलेले मूल तरी कसे तर्कनिष्ठ विचार करणार?
शांतता हवी म्हणून इतर कुठेही गेले तरी ती कुठे मिळते आजकाल? कोणत्याही गावी, कोणत्याही खेड्यात, जंगलात, दरीत, रानावर कुठेही गेले तरी आवाज आहे, अगदी निशब्द शांतता असली तरी दूर कुठे विमान डोक्यावरून उडते आणि भंगते ती शांतता!
स्वतःपाशी शांत बसण्याचा, स्वतःचे गुज स्वतःच्या मनाशी करण्याचा एक मूलभूत हक्क होता, आपल्या सगळ्यांना तोच आपण किती सहज काढून दिलाय ना? सतत बहिर्मुख असण्याचा जो रोग जडलाय ना, तो ह्यातून. कारण आपण स्वतःपाशी शांत असे बसूच शकत नाही, तेवढी श्रीमंती आपण आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीला देखिल देऊ शकत नाही! सतत आवाज, सतत कोलाहल आणि सतत ओरखडे, चित्रविचित्र किंवा सुमधुर आवाजाचे!
कुठे शोधून मिळेल मग ही शांतता? खरोखर काही गरज तरी आहे का हिची? इतके वर्ष झाली हिला नष्ट होऊन, काही कोणाचे वरवर पाहता अडले नाहीच आहे, तरी जसे तान्ह्या बाळाला त्याचे अनाथ होणे पुष्कळ उशिरा समजते आणि त्याहून उशिरा जाणवते तसे काहीसे झाले आहे आपल्या समस्त मानवजातीचे! हे अनाथपण अजून पुरते उमगले नाही आहे आपल्याला.
संगीतात जेवढे महत्व सुरांना आहे त्याहून अधिक महत्व त्यातल्या रिकाम्या जागांना आहे. ह्यासाठी नाही की दोन सुरांमधली ती रिकामी जागा त्या सुरांना उजळून टाकते तर ह्यासाठी की ही संपूर्ण सुरावट ही शांततेची पोकळी पेलून धरते आहे! ती पोकळी नसती तर सगळेच सूर गोंगाटात हरवून गेले असते! म्हणून ती पोकळी महत्वाची, ती रिकामी शांत जागा अतिशय गरजेची!
म्हणून मग ह्या शांततेचा स्वतःच्या आतमध्ये घेतलेला शोध म्हणजे मौन! सतत बोलत राहणारी अनेक माणसे असतात, काही जण भाषण देण्यात तरबेज असतात तर काही जण सतत काही ना काही बडबडत राहतात. काहीजण समोरच्याचे बोलणे पुरते न ऐकता, केवळ ह्याला काय प्रतिउत्तर देता येईल इतपत ऐकून पुन्हा बोलू लागतात. असे सतत बोलणे काहीच दर्शवत नाही. किंवा हेच दर्शवते की व्यक्ती खूप कमी सखोल विचार करते आहे. एखादी क्रिया सतत विरंगुळा म्हणून करते आहे. माणसाला बोलता येते, त्याला भाषेचे वरदान प्राप्त झाले आहे. मात्र त्याचा वापर आणि प्रयोजन केवळ ध्वनी निर्माण करणे आणि प्रक्षेपित करणे ह्याकरता नसून त्या अखंड अशा शांततेच्या पोकळीवर मर्यादित तरी सुगम असे काही उमटवण्यासाठी वापर करणे हे असावे!
केवळ समुद्राचा गाज, केवळ पक्ष्यांचे गुंजारव, केवळ पानांची सळसळ किंवा अनेक अब्जावधी कीटकांची किरकिर. झिम्माड पावसाचा आवाज, वादळाची अजस्त्र चाहूल आणि दवबिंदूंची हलकेच टिपटिप! करड्या पोकळीतून भुरभुरणारे शुभ्र असे हिमकण आणि दूर रानातून तरंगत येणारे प्राण्यांचे आवाज. हे सगळे विशुद्ध स्वरूपात आता आपल्याला किती कमी ऐकू येतात! तर त्या साऱ्याहून छोटा, अगदीच नाजुक तरी अतिशय महत्वाचा असा आपल्या आतला आवाज कसा काय ऐकू येईल आपल्याला ह्या महाकाय कोलाहलात?
म्हणून मौन! मौन ह्यासाठी नाही की कोणाला काही सिद्ध करून दाखवायचे आहे. फुशारकी मारायला देखील हे अतिशय कुचकामी! मौन ही कोणतीही विशेष अशी अवस्था नाही,कोणतेही मोठे असाध्य असे आसन नाही किंवा कोणतेही खास प्रयोजन नाही. मौन हे साधे सोपे आहे. मौन हे स्वतःतील शांताता ओळखणे आहे. मौनाचे देखील अनेक प्रकार आहेत. एक मौन अतिशय अजाणते आहे, त्याला मूढतेची झालर आहे, काही न समजल्याने हे मौन हाती येते. दुसरे आहे बावरलेले मौन, सभोवताल गुदमरून टाकत असेल तर जे हाती लागते ते हे मौन! तिसरे मौन आहे सोयीचे, जाणून बुजून स्वीकारलेले, क्रिया करण्याबाबत आळस किंवा अनिच्छा असल्या कारणाने स्वीकारलेले मौन. चौथे आहे सभोवतालचा संपूर्ण नकार, जे जे सुरु आहे त्याबाबत संपूर्ण असहमती दर्शवणारे मौन. पाचवे आहे स्वतःच्या आत जाणारे मौन, ह्यात केवळ कुतूहल आहे, कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रह ह्या मौनास चिकटलेले नाहीत. सहावे आहे स्वतःचा संपूर्ण स्वीकार आणि आंतरिक जाणीव जागृत झालेले मौन, ह्यात पूर्ण अंतर्मुख अवस्था नजीक आल्याचे ज्ञान आहे. सातवे आहे समंजस असे सर्वसमावेशक असे मौन, वृक्षांचे असावे असे. आठवे आहे दृढ आणि स्वतःत रुजलेले असे मौन ज्याला इतर कोणत्याही बाह्य कारणांनी परिणाम होत नाही असे. आणि नववे आहे चिरकाल, शाश्वत असे अवकाशाचे मौन.
ध्वनी उत्पन्न करण्याची उर्मी जेवढी आणि जशी उत्कट आहे त्याहून अधिक विशाल आणि व्यापक असे काही असेल तर ते म्हणजे मौन.
मौनाची साधना आहेच, त्यात सातत्य आलेच आणि सरतेशेवटी त्याला शरण जाणे अपरिहार्य! कारण त्या मौनातून काही गवसत जाणार आहे, काही विकसित होत जाणार आहे आणि त्यातून आपणच आपल्याला अधिक स्पष्ट कळत जाणार आहोत. ह्या मौनातून मनप्रदेशाची सफर घडणार आहेच, मात्र कोणत्या मौनापाशी आपण आहोत हे समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. हे मौन जर पहिल्या चार प्रकारातले असेल तर ते तितकेसे उपयोगी नाही. कारण हे मौन फारसे काही वृंधिगत करत नाही, केवळ सोयीस्कर वापरता येते. ह्यातून क्रिया करण्याबाबतची अनास्था आणि आळस इतकेच अभिप्रेत आहे. मौनाची जी पाचवी अवस्था आहे, तिथून पुढे मौन खऱ्या अर्थाने शांततेकडे घेऊन जाते. वाचाळतेकडून शांततेकडे. शब्द, शब्दांच्या अगोदर विचार, विचारांच्या अगोदर ची जी सूक्ष्म अशी तरंग अवस्था आहे, त्या दोन विचारांमध्ये असलेले अंतर, उमजणे आणि त्या अंतरावर लक्ष केंद्रित करता येणे आणि सातत्याने तसे करून त्यातील अंतर वाढवत नेणे हे कदाचित ध्यानाचे प्रयोजन असावे!
आजच्या जगात ह्याहून मोठा आणि शक्तिशाली बंड असेल असे वाटत नाही!
जिथे प्रत्येक जण, प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती ही प्रतिक्रियांच्या मोहोळात अडकत चालली आहे, तिथे प्रतिक्रिया न देता थांबता येणे ह्याहून अधिक काय शक्तिशाली असेल? प्रतिक्रिया नाही, क्रिया नाही, तर गर्द खोल हिरवाईत माखलेले शांत, नैसर्गिक मौन! मनाला चळवणाऱ्या हजारो प्रलोभनांना अजून जी शक्ती प्राप्त झालेली नाही ती म्हणजे मौन! असा प्रदेश ज्यावर अजून तरी मानवाची सत्ता आहे, असू शकते.
इतके खोल, छाती दडपवून टाकणारे, धमन्यांतून वाहणारे रक्त ऐकू येईल इतपत शांत असे मौन तुम्ही कधी अनुभवले आहे?
जर असेल तर तुम्हाला नक्की माहित आहे की तुम्ही किती श्रीमंत आहात आणि जर नसेल तर तुम्हाला कदाचित अजून देखील स्वतःचे सार्वभौम राज्य आहे, ते तुमची वाट पाहत आहे हे शोधायला हवे आहे!
असा मनामनात जर पुन्हा मौन साचू लागला, वृद्धिंगत होऊ लागला तर कदाचित पुन्हा शांतता जन्माला येईल, पृथ्वीवर, आणि कदाचित सर्वांना पुन्हा पृथ्वीचे गीत ऐकू येईल, स्पष्ट आणि स्वच्छ!
प्राजक्ता पाडगांवकर
BMM वृत्तमध्ये पूर्वप्रकाशित