Prajakta Padgaonkar

आठवण

मनालीने कॅमेराचे सेटिंग तपासले, आज ती तिच्या यूट्यूब चॅनेलसाठी शंभरावा पदार्थ रेकॉर्ड करत होती! नेहेमीप्रमाणे तिच्या खास शैलीत ती सांगू लागली,अगदी सहज, रेकॉर्ड बटन सुरु करून, लायटिंग आणि साउंड तपासून बोलू लागली, एका फोनवरून ती एफबी लाईव्ह पण जाणार होतीच! सगळा जामानिमा करून ती बोलू लागली… 

“एखादवेळी एक छोटी कढली सावरून शेगडीवर ठेवावी, त्यात सढळ हाताने लकाकते शेंगदाणा तेल ओतावे आणि थोड्यावेळाने तेलावर हात धरून तेलाचा ताव तपासावा, मनासारखे तापलेले तेल बघत त्यात एक चमचा मोहरी, किंचित जिरे घालावे आणि ते तडतडू लागले की आच कमी करून त्यात हळद आणि कढीपत्ता घालावा, आच काढून त्यात हिंग घालावे आणि ताज्या केलेल्या दडप्या पोह्यांवर ही फोडणी घालावी! चुरचुरत फोडणी ओल्या खोबऱ्याला बिलगत, पोह्याला माखत सर्वदूर पसरते! कांदा, कोथिंबीर खमंग करत ही फोडणी दाण्यावर जाते आणि करत करत घरात एकच गंध दरवळतो! पोहे झकास तयार झाल्याची ग्वाही म्हणजे नाकात बसलेल्या हिंगाचा ठसका! मग मात्र हात धुवून पोहे हाताने कालवू लागले की हाताच्या नखांवर हळदीची हमखास फिक्कट सय उरणार, पंज्याला मऊ लुसलुशीत खोबरं बिलगणार आणि कोंथिंबीर तर तर्जनीला भेटायला येणारच! समोर वाढलेल्या ताटल्यात हाताने मूठ मूठ पोहे वाढले की तो फिक्कट पिवळसर हात धुवून पुढ्यातले पोहे खायला बसलं…”

रेकॉर्डिंग सुरूच राहिले… मनाली  बोलत राहिली, आज अचानक काही कढत आठवणी तिच्यातून बोलू लागल्या जणू… 

“… की पहिल्या घासातच सांडगी मिरचीचा जोरदार ठसका लागणे अगदी पक्के ठरलेले… आता कोण आठवण काढतंय हा प्रश्नच कधी येत नाही, खात्रीच असते, आई बाबा आठवण काढत असणार, नव्हे मीच त्यांची आठवण काढते आहे! 

म्हणजे ते आई बाबा आहेत म्हणून आठवण असे देखील नाही, तर छोट्या छोट्या गोष्टीतून ते, त्यांचा सहवास आठवत राहतोच ना, जसा आत्ता! दडपे पोहे म्हणजे रविवार सकाळचा पदार्थ! म्हणजे सकाळी आई, बाबांना एक दोनदा तरी समजेल, दिसेल अशा जागी नारळ ठेऊन बघणार, तरी लक्ष गेलं नाही तर शेवटी साडेसातच्या दरम्यान, रंगोली हा तिचा आवडता गाण्याचा कार्यक्रम अर्ध्यावर सोडून आत जाऊन एक मोठा बत्ता घेऊन येणार आणि अगदी सराईतपणे नारळ वाढवणार! त्याचं पाणी अगदी जपून एका फुलपात्रात काढून ठेवणार आणि मग उरलेला नारळ उभ्याने विळीवर खोवून घेणार! तो मऊ लुसलुशीत पांढरा डोंगर मनाजोगता उंच झाला की कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि मिरच्या बारीक चिरून घेणार, मग डब्यातून मिरगुंड बाजूला काढून खालच्या सांडगी मिरच्या घेणार आणि चांगल्या पाच सात घेऊन त्याही बाजूला ठेवणार. तोवर आम्हा मुलांना बेताची कल्पना आलेली असेच, मग आमच्या स्वयंपाकघरात उगीच फेऱ्या वाढत, थोडे नारळ पाणी प्यायचा प्रयत्न करायला किंवा मग थोडे ताजे खोवलेले खोबरे  खायला! खोबऱ्याच्या म्हाताऱ्या ताटाच्या कोपऱ्यात ह्याच करता ठेवत असावी ती बहुदा… मग मध्येच ती दाणे काढून ठेवी, आता त्यावर देखील आमचा डोळा असेच! आई मात्र आपल्याच तंद्रीत चपळाईने काम करत असे! एकीकडे पुढच्या जेवणाची तयारी, पाणी भरणे आणि कानाने गाणी ऐकणे असे तिचे सगळेच सुरु असे. करत करत ऊन मागल्या खिडकीतून पार तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर चमकू लगे तरी ती तिच्याच तंद्रीत असे. 

मोठा एक सट घेऊन त्यात ती हळूहळू चाळलेले पोहे काढून घेई, मग त्यावर खोवलेले खोबरं आणि चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि मिरची घाले, त्यावर ओल्या नारळाचे पाणी शिंपून ठेवी आणि सगळे पोहे दडपून ठेवे. 

त्या संमिश्र वासाने खरेतर आमची भूक चेकाळली असे, मात्र तिच्या मनाजोगते पोहे दडपेपर्यंत त्यावर ती काही केल्या टोमॅटो आणि फोडणी घालत नसे! तिचे आपले हळू हळू सांडगी मिरच्या तळणे, थोडी मिरगुंडं तळून उगीचच बाजूला ठेवणे असे चालू असे. मग ताटल्या समोर मांडून, पुन्हा शेगडीवर चहाचे आधण ठेवणे सुरूच राही. 

आमच्या दृष्टीने खूप मोठा काळ भासणारी वेळ सरली की हिचे पोहे हिच्या मनाजोगते दडपलेले असत, मग त्यावर मस्त लिंबूरस, थोडी अजून कोथिंबीर आणि खोबरे आणि मग टोमॅटो आणि शेवटी ती चरचरीत फोडणी पडे!

पदर खोचून, हात धुवून ती सहज पोहे कालवू लागे आणि आम्ही पोरं अधाशासारखी ताटली घेऊन समोर उभे राहत असू! ती शांतपणे सगळ्यांना दडपे पोहे वाढी,  चहा वगैरे करून मग स्वतःची ताटली घेऊन अगदी शेवटल्या गाण्यापुरती टीव्ही समोर येत असे! रविवार पुढे आमच्यासाठी सुरूच राही, म्हणजे कुठले तरी कार्टून, तर अजून काही असे, ती मात्र तिचे अगदी आवडते पोहे पार घाईगडबडीत संपवून पुढल्या कामाला लागे. 

प्रसंग खरेतर इतकाच, मात्र गंमत पुढे असे, बाबा चहा संपवून तिच्यासाठी खास कॉफी करून घेऊन येत, तिला आवडते तशी थोडी कमी गोड आणि दुधाळ, वेलची जायफळ घातलेली. मग त्या एका ओझरत्या क्षणात तिचे डोळे लकाकत बहुदा…ते कधी लक्षात येई तर कधी नाही, एक मात्र कायम लक्षात असे, तिच्या पोह्यात कधीच ती कोथिंबीर घालत नसे!

असे अनेक रविवार गेले असतील, अनेक वर्ष ह्यातले फारसे घडी न विस्कटता घडतच राहिले. आम्ही मोठे झालो तरी रविवारी दडपे पोहे होतच राहिले, पुढे कधी परगावाहून आलो, परदेशातून घरी गेलो तरी रविवारी हे पोहे भेटतच राहिले, तरी जेव्हा स्वतःचा संसार इथे एवढ्या दूर सुरु झाला तरी तो माहोल कधी नाही बनला! काय की!

आता गेली वर्षभर तर लॉकडाऊन! तसे अनेक वर्ष आता आई बाबांचा संसार आहे, आम्ही पाखरं एका दशकांपूर्वीच उडून गेलो आहोत आपापली घरटी थाटायला…ते दोघे अजूनही करून खातच असतील दडपे पोहे, तरी इथे प्रत्येक वेळी दडपे पोहे असोत किंवा अजून एखाद जिन्नस करताना अगदी अवचित आठवण दाटून येते, असे वाटू लागते, आता मी आई होऊन ह्या दोघांना लाडाने दडपे पोहे करून द्यावे! एखाद वेळी जमून आलाच कोणताही पदार्थ तर फार फार रुखरुख लागून राहते, वाटतं आत्ता हा पदार्थ त्यांना नेऊन द्यावा! 

ह्या सक्तीच्या दुराव्यात तर असे अनेकदा झाले, पदार्थ करायचे जेव्हा जगाला ऊत आले होते, माझे हात काहीसे गोंधळात होते, मला करता तर खूप पदार्थ येतात, मात्र ज्यांनी ते कसे करायचे हे कधीही न शिकवता शिकवले, आपल्या माणसाच्या मनीचे गुज न बोलता कसे ओळखावे, हे न बोलता  दाखवले, त्यांचे मन आणि पोट भरावे असेच वाटत राहिले. आठवणी तर श्वासाबरहुकूम येतच राहतात, मात्र अशा प्रत्येक जुन्या लाडक्या पदार्थांचे पदर धरून जेव्हा आठवणी येतात ना, तेव्हा अगदी कासावीस होते मन… 

पोहे दडपू घातले होते का आठवणी, हेच कळेनासे होते…”

आज मनालीच्या एफबी लाईव्ह ला पाच हजार व्ह्यू होते…त्यात चार थकलेले डोळे देखल होते! मन भरून लेकीला न्याहाळणारे… दुरूनच. 

प्राजक्ता पाडगांवकर  

 BMM

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *