Prajakta Padgaonkar

सण आणि सणाचे औचित्य

सण आणि सणाचे औचित्य साधून साजरे करायचे क्षण…प्रत्येक सण हा केवळ आजचा उत्सव नसून मागच्या सर्व वर्षांच्या स्मृतींचे एक अनोखे संचित देखील असतो!
लहानपणी त्या सणातले नेमके काय आवडले होते, त्याच्या स्मृती तयार होतात, नव्या वस्त्रांचे, जरतर तलम पोतींचे असेच विलक्षण धागे गुंफले जातात आणि प्रत्येक नव्या वर्षी ते सगळे सगळे आठवत राहते, आठवांचा तो सुवास; मंदसा, सभोवताली दरवळत राहतो…मग आठवते ती चव, प्रत्येक सण म्हणजे एखाद विशिष्ठ पदार्थ, त्याची तयारी आणि मग त्याचा घरभर पसरणारा गंध…रेंगाळणारा दूर कुठे आपल्यालाच गतस्मृतीत घेऊन जाणारा…
मग आठवतात ते स्पर्श, शुभाशिषांचे, फुलांचे, मेंदीचे, आपल्याच भिजक्या तळव्यांचे…
मग उफाळून येतात ते गंध, अतिशय मोहक आणि लकेरीत फिरणारे गंध…प्रत्येक सणाचे निरनिराळे गंध, कधी दर्प तर कधी नसण्याने भरलेला आसमंत…
प्रत्येक सण हा अनेको इंद्रियांचा सोहळा असतो निश्चित, प्रत्येक जाणिवेची जाण, तिची लालसा चेतवणारी एक प्रखर ठिणगी!
गेल्या दहा वर्षांत, घर सोडून अनेक ठिकाणी घर म्हणून राहणे झाले…त्या दहा वर्षांत, एक अशी कोणतीच गोष्ट, व्यक्ती खूप जास्त हवीशी वाटली नाही, मात्र एक मिरमिरीत जाणीव सतत भिजक्या पावलाने आठवांच्या अंगणात चक्कर घालून जाई…प्रत्येक गोष्टीतला सोहळा आणि प्रत्येक सोहळ्यातली गोष्ट आठवत राही…ते संचित पुन्हा नव्याने बांधता येईना, ना सांधता येई…वर्ष सुरु होई, ते नवीन वर्ष मी गेले अनेको वर्ष घरी साजरेच केले नव्हते…तरी प्रकर्षाने नवीन डायरीच्या कोऱ्या पानांचा वास स्मरतो, काळ्या शाईची एक आणि निळ्या शाईची एक अश्या दोन दौती घेऊन, एकाग्र चित्ताने त्यांची सरमिसळ करताना दरवळणारा एक लुब्ध करणारा गंध स्मरतो…sketchpen च्या शाईचा ओलसर रंगीत गंध स्मरतो आणि मग आठवते ती शाईचेपेन पहिल्याप्रथम चाचरत कागदावर उमटते तो क्षण…वाळून गेलेल्या शाईच्या थेंबावर नव्या शाईचा स्वेद उमटतो आणि त्याक्षणी काही निराळेच भासून जाते, सगळा नोंदवून ठेवण्याचा अट्टाहास एक सोहळा होऊन जातो…पहिले पानभर एक आवडलेली कविता उमटते, दुसरे पान स्वप्नांनी भरते आणि तिसऱ्या पानावर तारीख उमटते, १ जानेवारी…आणि प्रत्येक वर्षी त्यानंतर एक क्षण थबकून थांबलेला हात…जगात कुठेही असले तरी हा सोहळा नित्याचाच…
मग अगदी जवळच्या व्यक्तींचे वाढदिवस, अनेको वर्ष एकाच पद्धतीने साजरा केलेले…त्यात तोच साधेपणा आणि अतिशय ममत्वाचे भाव, निर्व्याज प्रेम आणि एक चिरकाल स्मृतीत राहील असे मोजकेच संवाद…
मग सरत सरत मार्चचे आगमन, शाळेत परीक्षांचा मोसम आणि बाहेर निलगिरीच्या भिंग्र्यांचे सडे…निलगिरीची केसाळ, पिटुकली फुलं आणि मग त्यांचे फिक्कट पिवळे भिज्के कोन…तो दर्प असा विस्कटून सांगूच शकत नाही, तरी तो निश्चित आठवतो, प्रत्येक मार्च मध्ये…तो थोडा विरतो ना विरतो तोच आम्रबहर खुणावतो, आंब्याला फुटणारे पहिले वहिले धुमारे…त्या कोवळ्या लुसलुशीत ताम्र पालवीतून डोकावणारे हिरवे तुरे…एवढ्या बलाढ्य झाडाची फुलं इतकी नाजूक, चांदणचुऱ्याची पखरण जणू! इतकी फिक्कट पिवळी, हिरवाईची तीट लेऊन गुडूप झोपलेली इवली पिल्ले! मात्र त्यांचा घमघमाट!!! हलके चिक गळू लागला की संपूर्ण वातावरण जणू त्या घमघमाटाने चेतवू लागते, घुमू लागते… आम्रबहराची लय हलके खुणवीत राहते, मात्र तिचा मधाळ स्वर टिपेला पोचतो तो एखाद्या संध्याकाळी, संधीप्रकाशात! प्रत्येक काच माखलेली, नारिंगी, केशरीमिश्रित लाल, शेवरीच्या फुटलेल्या बोटींतून हलके हलके पिंजारलेल्या स्मृती दूर दूर पसरू लागतात, सूर्याला भान राहत नाही बुडण्याचे आणि दिवसभर विरहिणीगत चिक गाळणारा आम्रवृक्ष त्याच्या ताम्रपालवीत एक एक सूर्यकिरण ओवून लख्ख उभा ठाकतो, सातव्यात जशी ओजामुळे तेजस्वी भासणारी गर्भिणीच जणू…अचानक सगळे एक क्षण थबकते, आणि कुंदश्या ढगातून कोर डोकावते, सूर्याला एक हलका शहारा यावा आणि सगळे मोह क्षणात सोडून त्याने चालते व्हावे…प्रेयसीचा प्रियकर दिसल्यागत…तो मानी हंबार जर गंधात कैद करता आला असता तर त्याला आम्रबहराचा सुवास असता…
चैत्र आणि मार्च ची मोठीच गल्लत असते, कधी अतिभिजवलेल्या हरबरयांचा आंबूस वास आठवतो, तर कधी आंबे डाळीतल्या सांडगीमिरचीत उतरलेला सूर्य नाकात बसतो…हिंगाची ती मुरलेली चव नाकातून उतरत नाहीच बहुदा, डोक्याच्या एखाद्या टणक कपारीला चिकटून बसते…म्हणे म्हणेस्तोवर गुलमोहर बहरू लागतो, सोनबहावा फुलून वेडा होतो आणि रस्तोरस्ती दुपारी गळणारी पिवळी, जांभळी हळवी फुले रस्ताभर गालिचे अंथरत राहतात, मूक, गंधहीन सोहळे, प्रेमाचे…
गुलमोहर हे रसायन अजब! शाळेत फुलं हिंस्त्रपणे ओरबाडून त्यांचे मौऊसुत तांबडेपण नखांवर चिरडून चिकटवण्यात, त्याने राक्षस बनून एकमेकांना घाबरवण्यात, दुपारी सरून जायच्या, मोठेपणी त्याचे एकमेव पांढुरके पान देठाकडून खाऊन त्याचे तुरट आंबटपण जिभेवर रेंगाळू देण्यात मौज असे आणि अजून पुढे कधी कुंचला हाती आला तेव्हा एक फुल चितारावे म्हणून देखील सुचले गुलमोहर, अख्खे माळरान चितारावे, तरी सुचले गुलमोहर…गुलमोहराच्या झाडाचे भूत देखील लाल फुले देईल का, ह्या प्रश्नापाशी अजून काही संध्याकाळचे क्षण रेंगाळतात…दुरून जाताना गाडीवरून दिसले झाड तरी जुना मित्र गर्दीत भेटावा, एक क्षण नजरानजर व्हावी आणि ओळखीचा हात दाखवून दोघांनी समंजसपणे पुढे जावे, अश्यातला दुवा…गुलमोहर! त्याच्या वर टरारून आलेल्या मुळांवर बसून, वाळक्या लाल सड्यात, कवितांची वही घेऊन बसावं आणि निर्हेतुक प्रत्येक प्रेमकवितेला खुण म्हणून एक तांबडी पाकळी पेरावी…असा गुलमोहर…प्रत्येक रुपात मोहक, प्रत्येक वयात मनहरी…
मे महिन्याचा तडाखा असा पडावा, प्रत्येक लकाकणाऱ्या डांबरी रस्त्यावर मृगजळ पसरावे आणि सूर्याचे चित्कार ऐकू येतीलसे भासावे, धम्मक गोडपण मुरत जावे आणि आमरस पुरीचा बेत ठरावा…नटखट आजीने आधी पानात पुरी, मग ताजा मुरंबा वाढून निघून जावे आणि आमरसाची तृष्णा अधिक चेतावी…
जून-जुलै, आभाळी जणू अभंग उमटावे, प्रत्येक मेघातून काळे सुवाच्य ज्ञानामृत पाझरावे…आणि जवळच कुठे तुकोबांनी अभंग रचले होते, ते आभाळ इथवर फाकले आहे ही जाणीव व्हावी आणि पुन्हा ढगात त्या ओव्या, अभंग शोधावे…वारी येणार म्हणून शहर सजते का खिचडीच्या तुपकट वासात आमचे गाव भिजते, तेच कळत नाही, आजूनही…
मनभर माऊली माऊलीचा मोरपिसारा माखावा आणि प्रत्येक डोळ्यातून जणू एकच निळाशार गारवा झरावा…पावसाळा दरवर्षी असाच सरावा…
गणपती गौरी यावेत…पहिला वास म्हणजे डिंकाचा, मखर बनवताना बोटावर चिटकून बसलेला…ती सालटं काढताना रात्र सरावी आणि मग दिवस उजाडावा तोच बाजारातले पहिले कमळ आणि केवड्याची जमतील तेवढी कणसे निवडावीत, पत्री निवडून घेताना वास न घेण्याची कसरत करत, घरी पोचावे, पुढचे सगळे दिवस थर्मोकॉल वर पडणारा अगरबत्तीचा कडूशार गंध, त्यावर जणू कापुराचा लेप आणि मध्येच जाणवणारा बुक्क्याचा काळपट थर…चित्त स्थिर होणार कुठून पार्थिव मूर्तीवर…हे सगळे सभोवताल इतके गंधाळलेले असताना…गौरी आल्या की ओल्या खोबऱ्या-खसखशीचा चरचरणारा गुळात घोळलेला उबदार सुवास…तोंडात विरघळणारी चव, तृप्तीचा एक निसटता क्षण तो!
पितृपक्षातले आवडते पदार्थ भाजणीचे वडे, ती काळपट जांभळी आमसुलाची चटणी आणि पांढरी कढी…कावळा लवकर शिवावा गच्चीतल्या पानाला, म्हणजे मला वडा खाता येईल, असेच वाटे, त्या दिवशी हटकून मनात कधीच कोणत्याच पितराच्या स्मृती देखील कावळ्यागत शिवत नसत, आठवत असे फक्त ते जेवण…
नवरात्रीत फक्त एकच सुचे, संध्याकाळी कुठे टिपऱ्या खेळायला जायचे, भोंडल्याला खिरापत लवकर कशी ओळखायची…त्या दिवसात येणारी परीक्षा इतकी नकोशी वाटे, भूगोलाच्या अभ्यासासाठी कोणी गरब्याची गाणी वाजवली तर काय लक्षात राहणार म्हणा! नवरात्रीत आठवते ते म्हणजे घागरी फुंकणाऱ्या बाया, तो दर्प आणि मळवट…काय नेमकं होत आहे ह्यांना असेच वाटत राही…काही बोलायचे आहे का, त्या घड्याला त्या काही सांगू पाहत असाव्यात…
नवमी म्हणजे झेंडू, शेवंती आणि मिळालाच तर खूप सारा मरवा! मोठ्ठाले हार, हात माखलेले त्या तांबूस रंगात, झेंडूचा एक राकट गंध आणि खोबरी पाठा, अनेक फुलांच्या, पोटात गेलेल्या…आणि खूप सारी घाई…दसऱ्याची…
आपट्याची पाने, फांदीसकट वाळून गेलेली, मग गल्लीभर फिरून अजून “सोनं” गोळा करायचे आणि मग शाळेतल्या डब्याला पुढचे अनेक दिवस एक हिरवट, वाळका गंध चिकटून राही, सोन्याचा!
मग आवडता सण असे कोजागिरी! चंद्रावर तंद्री लाऊन बसणे हा इतके वर्ष आवडता उद्योग, की सांगायची सोय नाही…उकडलेल्या शेंगा, मसाला दुध, गाणी आणि सुकी भेळ…साधासा बेत पण मन भरून जाई… दुधात उमटलेले चंद्राचे बिंब म्हणजे आपल्या हक्काचे मालकीचे असेच वाटत राही… तो कोमटसा चंद्ररस, हलके प्राशन करून झाला की करत करत पायाला मुंग्या आल्या, झोप आली असे म्हणून मैफिल मोडू लागे, मग त्या सर्व पसरलेल्या सत्रंज्यांवर एकटेच पहुडावे, एक करडा ढग हलकेच चंद्रासमोर यावा आणि डोळे बंद केले की पुन्हा लाकाक्णारा चंद्र भासावा…एक हलकी लेकर उमटावी वाऱ्याची, ढग सरावा आणि तो प्रियतम सोहळा चंद्राला न्याहाळण्याचा, सुरूच राहावा…
कोजागिरीची थंडी खरोखर भिनावी ती थेट नरक चतुर्दर्शी ला उघडावी…पहाटे ४ला उठून दार उघडावे तोच एक जोरदार झेप टाकत वाऱ्याने लपेटून घ्यावे…पणत्यांच्या उबेत कुडकुडत घराभोवती प्रदक्षिणा व्हावी, शेवटची पणती मागल्या दाराला लाऊन कुडकुडत आत शिरावे…सुगंधी तेलाचे अभ्यंग, आणि डोक्यावरून वाहणारी ती कढत पाण्याची पहिली धार…अमीट सुख! डोळ्यासमोर प्रकाशमान दिवे, तो ओल्त्यानेच कपाळावर लागलेला कुंकवाचा स्पर्श आणि चार तांदळाचे दाणे…उटण्याची पहिली चार बोटं उमटवीत आणि कविता तिथेच उमजवी!
दिवाळीचे दिवस संपता संपता एखाद सकाळी रस्ताभर पसरलेला फटाक्यांचा सडा दिसावा, तो करडा, चमचमणारा वास आणि हवेत न विरलेला धूर नाक्पुड्यात शिरावा आणि दिवाळीच्या ह्या रूपाचा सणसणीत राग डोक्यात उमटावा…लालेलाल…
पुन्हा फिरून नववर्ष येतेच…अधेमध्ये श्रावणातले सणवार, ईद, रमजान आणि तीज चे प्रसाद, वाटेत भेटणारे ठराविक खाद्यपदार्थ आणि रस्त्यावरचे गंध दुर्गंध…सगळे सगळे गुंडाळून एक वर्ष बनावे आणि अशी वर्षांची सगळी भेंडोळी दरवर्षी, प्रत्येक नव्या गावी मनातून वागवत न्यावीत, सातासमुद्रापार…आणि मग कुडमुड्या थाटात भलतीच फुले- रंगहीन, गंधहीन सणवार साजरे करताना दर वर्षी त्या सर्व सरलेल्या स्मृतींचे एक आवर्तन मांडावे…
असे सोहळे गोष्टींचे, अश्या गोष्टी सोहळ्यांच्या…

– प्राजक्ता पाडगांवकर



 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रत्येक सण हा अनेको इंद्रियांचा सोहळा असतो निश्चित, प्रत्येक जाणिवेची जाण, तिची लालसा चेतवणारी एक प्रखर ठिणगी!”

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *